बिबट्याचा मलकापूर तालुक्यात पुन्हा धुमाकूळ; दूधलगाव परिसरात शेतकऱ्याच्या गोऱ्यावर हल्ला; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

मलकापूर : तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असून, शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जुने दूधलगाव व नवे दूधलगाव खुर्द यांच्या मधील शेतशिवारात बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घालत शेतकऱ्याच्या गोऱ्यावर हल्ला करून पळश्या पाडल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी ईश्वर पंडित कांडेलकर, रा. दूधलगाव ता. मलकापूर जि. बुलढाणा यांनी नेहमीप्रमाणे सायंकाळी आपल्या शेतात गोऱ्या बांधल्या होत्या. दरम्यान रात्रीच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने गोऱ्यावर अचानक हल्ला चढविला. या हल्ल्यात गोऱ्याच्या पळश्या पडल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी, मजूर व नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. विशेषतः सायंकाळनंतर शेतात जाण्यास नागरिक घाबरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. परिसरात बिबट्याचा वारंवार वावर होत असल्याने वनविभागाने तातडीने पिंजरा लावून नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment