मलकापूर : माहेरहून पैसे आणण्यासाठी सातत्याने दबाव टाकणे, शारीरिक व मानसिक छळ करणे आणि मारहाण केल्याच्या आरोपांमुळे त्रस्त झालेल्या विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील विवरा येथे घडली. या प्रकरणी मृत विवाहितेच्या भावाच्या तक्रारीवरून सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरीता धनराज पाटील (रा. विवरा, ता. मलकापूर) यांनी २८ मे रोजी दुपारी १२.३० वाजण्यापूर्वी गावातील एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर मृत महिलेचा भाऊ वैभव जानकिराम पाटील (वय २२, रा. सूरवाडा, ता. बोदवड) यांनी दसरखेड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, सरीता पाटील यांना त्यांचे सासरे अशोक शामराव पाटील, सासू इंद्रायणीबाई अशोक पाटील, पती धनराज अशोक पाटील, दीर राजेश अशोक पाटील (सर्व रा. विवरा) तसेच नणंद अक्काबाई निलेश पाटील (रा. ढालसिंगी, ता. जामनेर) हे वारंवार माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत होते. यासोबतच त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यात येत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित छळाला कंटाळून सरीता यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध अप. क्र. ७०/२०२६ नुसार संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वारे करीत आहेत.