मलकापूर : भागीदारीच्या व्यवहारातून निर्माण झालेला वाद अखेर हिंसक वळणावर पोहोचला. नांदुरा रोडवरील एका हॉटेलमध्ये व्यावसायिकाला बेदम मारहाण करत त्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या हल्ल्यात व्यावसायिक गंभीर जखमी झाला असून, तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेख शब्बीर शेख गुलाम हैदर (वय ४६, रा. काळीपुरा, मलकापूर) हे रेल्वे पुलाजवळ वेल्डिंग व्यवसाय करतात. गुरुवारी रात्री ते नांदुरा रोडवरील पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या शिवनेरी हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या मयूर अभिमान हुंबे याने त्यांना एकत्र जेवण्याचे निमंत्रण दिले. त्याच्यासोबत विनय आणि पवन हे दोघेही होते.
जेवणादरम्यान भागीदारीच्या व्यवहारावरून चर्चा सुरू असताना वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत होताच मयूर हुंबे व विनय यांनी शब्बीर यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. त्यानंतर पवन याने टेबलावर ठेवलेली रिकामी बिअरची बाटली उचलून त्यांच्या डोक्यात मारल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या हल्ल्यात शब्बीर गंभीर जखमी झाले. घटनेनंतर आरोपींनी शिवीगाळ करत, “पोलिसांत तक्रार केली तर जीवे मारून टाकू,” अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीने नमूद केले आहे. जखमी व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी मयूर अभिमान हुंबे, पवन आणि विनय या तिघांविरुद्ध संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.