मलकापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता एवढी होती की मृताच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. दरम्यान, दुसरा दुचाकीस्वार अपघातानंतर स्वतःची दुचाकी घटनास्थळीच सोडून फरार झाल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिखली तालुक्यातील सव येथील रहिवासी समाधान सखाराम गुंजकर (वय ३८) हे गुरुवारी (दि. १६) दुपारी दुचाकीने नांदुऱ्याकडून धानोऱ्याच्या दिशेने निघाले होते. दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील शेरे पंजाब ढाब्याजवळ विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने त्यांच्या वाहनाला समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत समाधान गुंजकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर दुसरा दुचाकीस्वार स्वतःची दुचाकी तेथेच सोडून घटनास्थळावरून पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. फरार झालेल्या दुचाकीस्वाराचा शोध मलकापूर शहर पोलिस करीत आहेत.