जलंब : “शेजारधर्म जपला तर वाद मिटतात; पण क्षुल्लक कारणालाही अहंकाराची किनार लागली की संघर्ष अटळ ठरतो.” सांडपाणी टाकण्याच्या कारणावरून झालेला किरकोळ वाद विकोपाला जाऊन एका कुटुंबाला शिवीगाळ, काठीने मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना जलंब येथे घडली. या प्रकरणी जलंब पोलिसांनी पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी पूजा किशोर साबळे (वय ३१, रा. जलंब) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सांडपाणी टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून आरोपींनी त्यांच्या कुटुंबीयांना अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर काठीने मारहाण करून दहशत निर्माण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी दादाराव बाबूराव देशमुख, अनिकेत प्रशांत देशमुख, रेखाबाई बाबूराव देशमुख, शीतल प्रशांत देशमुख आणि बाबूराव देशमुख (सर्व रा. जलंब) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), ११८(१), ११५(२) व ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास जलंब पोलीस करीत आहेत.