मलकापूर : शहरातील संचेती गल्ली परिसरातील २७ वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, संबंधित युवकाचा अद्यापही कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. विशेष म्हणजे हा युवक जन्मापासून मुक असून मानसिकदृष्ट्या थोडा कमजोर असल्याने कुटुंबीयांची चिंता अधिक वाढली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खालीक शहा युनुस शहा यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचा भाऊ शाकीर शहा युनुस शहा (वय २७) हा ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडला. मात्र त्यानंतर तो परतलाच नाही. नातेवाईकांनी व परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध घेतला, तरीही त्याचा काहीच मागोवा लागलेला नाही. बेपत्ता युवक यापूर्वीही दोन वेळा घरातून निघून गेला होता, मात्र त्यावेळी तो परत घरी आला होता. यावेळी मात्र त्याचा शोध लागण्यात अपयश येत आहे.
तक्रारीनुसार, शाकीर याचा रंग सावळा, उंची अंदाजे ५ फूट ६ इंच, बांधा मजबूत असून अंगात हिरव्या रंगाचा शर्ट, काळी पॅन्ट व पायात चप्पल होती. अशा वर्णनाचा युवक कुठेही आढळल्यास त्वरित मलकापूर शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात मिसिंग क्र. १६/२०२६ नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश रोकडे करीत आहेत.