मलकापूर : काळेगाव शिवारात जंगली प्राण्याचा मुक्त संचार वाढल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका गायीची शिकार झाल्याची घटना समोर आल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, १४ मार्च रोजी काळेगाव शिवारातील गणेश हरीचंद्र सुरोशे यांची गाय दिसून न आल्याने त्यांनी परिसरात शोध घेतला. शोध घेत असताना गजानन बाठे यांच्या शेतात दुपारी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास गायीचा मृतदेह आढळून आला. ही शिकार जंगली प्राण्याने केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच माणिकराव बाठे यांच्या वासराचाही याच जंगली प्राण्याने बळी घेतल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या सलग घटनांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी व नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. ग्रामस्थांनी वन विभागाने तात्काळ घटनास्थळी पाहणी करून योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे.