मलकापूर : किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे गंभीर रूप घेत मारहाणीपर्यंत प्रकरण पोहोचल्याची घटना शहरातील मुस्ताक अलीनगर परिसरात घडली. या प्रकरणात लोखंडी पाइपने हल्ला करून अनेकांना जखमी केल्याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शेख रिजवान शेख समशेर (वय ३८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी जबीर खान इसा खान (वय १८) याने “सकाळी धक्का का दिला” या किरकोळ कारणावरून त्यांच्या भाच्याला चापट-बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच फिर्यादी व त्यांचे भाऊ शेख सोहेब, शेख सहेजाद तसेच इतर नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, वाद अधिक चिघळत आरोपीने लोखंडी पाइप आणून शेख सोहेब व अनिस मलीक यांच्या डोक्यात वार केले, तर शेख सहेजाद यांच्या तोंडावर मारहाण केली. भांडण सोडविण्याचा प्रयत्न करत असताना दुसरा आरोपी शेख सरफराज शेख अरिफ (वय २५) याने फिर्यादी व त्यांच्या भाच्यावरही पाइपने हल्ला करून जखमी केले. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध अप. क्र. १८७/२०२६ अन्वये कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३(५) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.