मलकापूर :- मलकापूर शहरातील सर्वात गजबजलेल्या आणि मुख्य समजल्या जाणाऱ्या गांधी चौक परिसरात सध्या ठेलेधारकांनी भर रस्त्यात ठेले लावून अक्षरशः कब्जा केल्याचे चित्र दिसून येत आहे. ईद सणाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असताना रस्त्याच्या मधोमध लावलेल्या ठेल्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे.
गांधी चौक हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा वर्दळीचा चौक असून येथून दररोज हजारो नागरिकांची ये-जा असते. विशेष म्हणजे ईदच्या खरेदीसाठी हजारो मुस्लिम महिला बाजारात दाखल होत आहेत, तर त्याच रस्त्यावरून तरुण, वयोवृध्द आणि इतर नागरिकही मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. मात्र काही ठेलेधारकांनी मनमानी करत रस्त्यालाच स्वतःची मालमत्ता समजून ठेले उभे केल्याने वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा होत आहे. गर्दीच्या या ठिकाणी वाहनांचा धक्का लागणे किंवा गर्दीत महिलांना चुकून धक्का लागणे अशी घटना घडल्यास मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा संवेदनशील परिस्थितीतही नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या ठिकाणी सुरक्षेसाठी काही होमगार्ड तैनात असले तरी ते वाहतूक नियंत्रण करण्याऐवजी सावलीत उभे राहून मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे चित्र दिसत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शहरातील मुख्य चौकात अशी परिस्थिती असताना प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, गर्दी वाढत असताना एखादा अपघात किंवा वाद उद्भवल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन गांधी चौकातील भर रस्त्यात लावलेले ठेले हटवून रस्ता मोकळा करावा आणि वाहतूक सुरळीत करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.