मलकापूर :- तालुक्यातील अनुराबाद शिवारात एका शेतकऱ्याच्या गोठ्यातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 73 हजार 600 रुपये किमतीची 16 क्विंटल तूर चोरून नेल्याची घटना 13 मार्च रोजी उघडकीस आली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुराबाद येथील तरुण शेतकरी मयुर राजेंद्र नारखेडे (वय 21) यांनी शेतातील तुरीची मळणी करून अंदाजे 40 क्विंटल तूर युरियाच्या 80 गोण्यांमध्ये भरून गावालगत असलेल्या त्यांच्या वाड्यातील पत्र्याच्या खोलीत साठवून ठेवली होती.
दरम्यान, 12 मार्च रोजी सायंकाळी साडेसहा ते 13 मार्च रोजी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी वाड्याच्या मागील बाजूने लोखंडी पत्रे वाकवून आत प्रवेश केला. त्यानंतर खोलीत ठेवलेल्या तुरीच्या गोण्यांमधून 16 क्विंटल तूर लंपास केली.
ही बाब सकाळी लक्षात येताच मयुर नारखेडे यांनी तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दीपक राठोड करीत आहेत.
दरम्यान, शेतमाल व शेतीशी संबंधित साहित्य चोरीच्या घटना वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, अशा टोळ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.