जळगाव जा. /आसलगाव:- महामार्ग क्रमांक १६१ वर आसलगाव येथील उपबाजार समितीसमोर ट्रॅव्हल्स आणि ऑटो रिक्षामध्ये झालेल्या भीषण धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना २२ मार्च रोजी सायंकाळी घडली. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ट्रॅव्हल्सची तोडफोड केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
जळगाव जामोद येथून पुण्याकडे जाणारी ट्रॅव्हल्स (क्र. GJ-14-DW-0541) आणि नांदुराहून आसलगावकडे येणारी ऑटो रिक्षा (क्र. MH-19-BJ-2825) यांच्यात महामार्ग १६१ वरील आसलगाव उपबाजार समितीसमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की ऑटो रिक्षामधील जयश्री किसन उद्धट (वय ३८, रा. आसलगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात गजानन सोळंके (वय ४५), गोपाल श्रीकृष्ण उद्धट (वय १२), वंदना अनिल मेहंगे (वय ३५), नंदा प्रकाश डाबेराव (वय ३९) सर्व रा. आसलगाव तसेच मंगला भीमराव लोथे (वय ४५, रा. काजेगाव) हे गंभीर जखमी झाले. जखमींना सुरुवातीला जळगाव येथे उपचारासाठी पाठविण्यात आले; मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खामगाव येथे हलविण्यात आले आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक घटनास्थळी मोठ्या संख्येने जमले. संतप्त जमावाने ट्रॅव्हल्स वाहनाची तोडफोड केल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणी ट्रॅव्हल्स चालक जगदेव देवचंद राठोड (रा. पाचोरा, जि. जळगाव) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १०६ (१), २८१, १२५ (ए) तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.