भरधाव दुचाकीची धडक; ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू, अल्पवयीन चालकावर गुन्हा

खामगाव : शहरातील जलंब नाका वाडी रोड परिसरात भरधाव दुचाकीच्या धडकेत एका ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना २५ मार्च रोजी दुपारी घडली. निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचे समोर आले असून खामगाव शहर पोलीस ठाण्यात अल्पवयीन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामधन दशरथ ताठे (वय ७०, रा. कोक्ता, ता. खामगाव) हे दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास जलंब नाका–वाडी रोड परिसरातून जात होते. त्याचवेळी नवाज शाह रफिक शाह (वय १७, रा. बर्डे प्लॉट, खामगाव) हा त्याच्या ताब्यातील एमएच २८ के ९०५० क्रमांकाच्या दुचाकीवरून वेगात येत होता. दुचाकी भरधाव आणि निष्काळजीपणे चालवल्याने ताठे यांना जोरदार धडक बसली. या अपघातात ताठे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी गणेश मनोहर ताठे (वय ३८, रा. कोक्ता) यांच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलीस ठाण्यात कायमी अप. क्र. १७७/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(ब), १०६ तसेच मोटार वाहन कायदा कलम ३/१८१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गायकवाड करीत आहेत.

Leave a Comment