पोस्ट ऑफिसला बॉम्बने उडवून देण्याची ई-मेलद्वारे धमकी; बुलढाण्यात खळबळ

बुलढाणा : नागपूर पोस्ट ऑफिसला ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्यानंतर राज्यातील सर्व पोस्ट व पासपोर्ट कार्यालयांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर बुलढाणा येथील पोस्ट ऑफिसमध्ये पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाच्या मदतीने कसून तपासणी केली. मात्र तपासणीत कोणताही स्फोटक पदार्थ आढळून आला नसल्याने नागरिकांना घाबरण्याचे कारण नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर पोस्ट ऑफिसला ४ मार्च रोजी प्रथम ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी प्राप्त झाली होती. त्यानंतर २५ मार्च रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा अशाच प्रकारचा ई-मेल पाठवण्यात आला. या मेलमध्ये राज्यातील विविध टपाल कार्यालयांमध्ये तब्बल १६ आरडीएक्स बॉम्बस्फोट घडवून आणण्यात येतील, असा गंभीर इशारा देण्यात आला होता. तसेच ‘तात्काळ सर्वांना बाहेर काढा’ असा उल्लेखही मेलमध्ये करण्यात आला होता. या धमकीनंतर संपूर्ण राज्यातील पोस्ट व पासपोर्ट कार्यालयांना तातडीने सतर्कतेचे आदेश देण्यात आले. त्यानुसार बुलढाणा येथील पोस्ट ऑफिसमध्ये पीएसआय मोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी बॉम्ब शोधक व तज्ञ पथकाला पाचारण करून परिसराची सखोल तपासणी केली.
तपासणीनंतर पोस्ट ऑफिस परिसरात कोणताही स्फोटक पदार्थ किंवा संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे ही केवळ अफवा किंवा खोडसाळपणातून पाठवलेला ई-मेल असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या धमकीच्या मेलमुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोस्ट ऑफिसचे नियमित कामकाज सुरळीत सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोस्टमास्टर तसेच पोलिस प्रशासनाने केले आहे.

Leave a Comment