मागील भांडणाचा राग; मुलीची छेडछाड व मारहाण, आईच्या गळ्यातील सोन्याची पोथ तोडली

अंढेरा:- मागील भांडणाचा राग मनात धरून एका मुलीची छेडछाड करून तिला चापटा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच मुलीच्या आईच्या गळ्यातील सुमारे ३० हजार रुपयांची सोन्याची पोथ तोडून नुकसान करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना अंढेरा पोलीस ठाणे हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी २५ मार्च रोजी पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील विवाहितेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, ती आपल्या आई, मावशी व आजीसह नातेवाईकांकडे आजीला भेटण्यासाठी गेली होती. यावेळी मागील भांडणाच्या कारणावरून आरोपींनी गैरकायदेशीररीत्या जमाव करून शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी मुलीला वाईट उद्देशाने पकडून तिला चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. या दरम्यान झालेल्या धक्काबुक्कीमध्ये फिर्यादीच्या आईच्या गळ्यातील सोन्याची पोथ, ३ ग्रॅमचे डोरले व १० मणी असे सुमारे ३० हजार रुपयांचे दागिने तुटून पडून नुकसान झाले. तसेच आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी आरोपी आशा विक्रम मोरे, दुर्गा लक्ष्मण मोरे, दिनकर संपत बरडे, बाळू दिनकर बरडे व किरण दिनकर बरडे (सर्व रा. असोला बु., ता. चिखली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Comment