बसस्थानकातील गर्दीत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे डोरले लंपास

बुलढाणा : बसस्थानकावरील प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे डोरले लंपास केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शितल रणजित जाधव (वय ३०, रा. छत्रपती संभाजीनगर) या मंगळवार, २४ मार्च रोजी बुलढाणा येथे त्यांच्या आतेभावाची भेट घेऊन आईसोबत परत छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यासाठी बुलढाणा बसस्थानकावर आल्या होत्या. दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास त्या छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या पोतवर डल्ला मारला. बसच्या दरवाज्याजवळ पोहोचल्यानंतर शितल जाधव यांनी गळ्यातील पोत तपासली असता काही सोन्याचे मणी खाली पडलेले आढळून आले. मात्र पोतमधील अंदाजे साडेतीन ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे डोरले गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या दागिन्यांची किंमत सुमारे १५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे बसस्थानक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment