देऊळगाव राजा :- तालुक्यातील खडकपूर्णा धरण परिसरात अवैध रेती वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला असून, यासाठी थेट शेतातून बेकायदेशीर मार्ग तयार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
ग्राम महसूल अधिकारी ज्ञानेश्वर तांबे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार परमेश्वर पटावकर, अंकुश भागिले आणि विश्मयबर देशमुख (सर्व रा. टाकरखेड भागिले, ता. देऊळगाव राजा) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
महसूल विभागाने १० मार्च रोजी केलेल्या पाहणीदरम्यान हा प्रकार निदर्शनास आला. आरोपींनी त्यांच्या शेतजमिनीतून थेट जलाशयाकडे जाणारा रस्ता तयार करून त्या मार्गाचा वापर रेतीच्या अवैध वाहतुकीसाठी केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर रेतीची वाहतूक होत असल्याचेही समोर आले आहे.
तसेच, जलाशयाजवळ अवैधरित्या रेती उपसा करून ती साठवण्यासाठी खड्डे तयार करण्यात आल्याचे आढळले. या प्रकारामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
तहसीलदारांच्या आदेशानुसार २४ मार्च रोजी सायंकाळी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अवैध रेती उत्खननाविरोधात प्रशासनाने कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.