नांगरटी करताना ट्रॅक्टर उलटले; २४ वर्षीय चालकाचा मृत्यू

संग्रामपूर : शेतात नांगरटीचे काम करत असताना ट्रॅक्टर अचानक उलटून चालक तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना संग्रामपूर तालुक्यातील काकोडा येथे बुधवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काकोडा येथील चोंढी टाकळेश्वर शिवारातील गट क्रमांक २१ मध्ये एका शेतकऱ्याच्या शेतात गणेश अर्जुन मानखैर (वय २४) हा युवक ट्रॅक्टरद्वारे नांगरटीचे काम करत होता. काम सुरू असताना ट्रॅक्टरला वळण देत असताना अचानक तोल सुटल्याने ट्रॅक्टर अवजारांसह शेतातील ओसाड विहिरीत पलटी झाला. या अपघातात गणेश हा ट्रॅक्टरखाली दबला गेला. शेजारील शेतकऱ्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत युवकाला ट्रॅक्टरखालून बाहेर काढले. त्यानंतर त्याला तात्काळ उपचारासाठी शेगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र ट्रॅक्टरच्या वजनामुळे गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून शेगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. मृतक गणेश मानखैर हा अत्यल्प भूधारक कुटुंबातील असून तो रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे काकोडा गावात शोककळा पसरली आहे.

Leave a Comment