मुलगी परत आणण्याच्या कारणावरून आई-वडिलांना मारहाण; मुलगा व सुनेविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

 

खामगाव : तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथे कौटुंबिक वादातून मुलगा व सुनेने आई-वडिलांना शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना २६ मे रोजी रात्री घडली. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जानराव जगदेव जाधव (वय ५५, रा. हिंगणा कारेगाव, ता. खामगाव) यांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा गणेश जानराव जाधव व सून चैताली गणेश जाधव यांनी ‘तुम्ही मुलगी परत का आणायला लावली’ या कारणावरून फिर्यादी व त्यांच्या पत्नीला अश्लील शिवीगाळ केली. वाद वाढल्यानंतर आरोपी गणेश जाधव याने फिर्यादी जानराव जाधव यांना काठीने मारहाण केली. तसेच आरोपी चैताली जाधव हिने फिर्यादीच्या पत्नीचे केस ओढून चापटा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना २६ मे रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कायम अप. नं. १८१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८(१), ११५(२), २९६, ३५१(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय अहवाल व फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोहेका किरण राऊत करीत आहेत.

Leave a Comment