आसलगाव :- जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजुरा शिवारात आढळलेल्या कथित खून प्रकरणाच्या तपासात गंभीर हलगर्जीपणा झाल्याचे उघड झाल्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासनाने तातडीची कारवाई करत चार पोलीस कर्मचाऱ्यांची बुलढाणा पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली आहे. मृत समजण्यात आलेली तरुणी प्रत्यक्षात जिवंत असल्याचे समोर आल्यानंतर या संपूर्ण तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
जळगाव जामोद पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २८३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) व २३८ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजुरा शिवारात सापडलेल्या शिरविरहित मृतदेहाची ओळख मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील शिवानी कलमेकर या बेपत्ता तरुणीची असल्याचा निष्कर्ष तपास पथकाने काढला होता. त्यानंतर शिवानीचा खून तिच्या वडिलांनी व भावाने केल्याचा आरोप ठेवत त्यांना अटक करून कारागृहात पाठविण्यात आले होते.
मात्र, २८ मे रोजी या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले. मृत समजण्यात आलेली शिवानी कलमेकर ही तरुणी जिवंत आणि सुखरूप अवस्थेत पोलिसांसमोर हजर झाली. या घटनेनंतर तपास प्रक्रियेतील त्रुटी उघड झाल्या असून संपूर्ण तपासच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल एजाज रफिक खान, पोलीस कर्मचारी अमोल शेजोळे आणि अजित रहमान परसुवाले यांना पुढील आदेशापर्यंत तात्काळ प्रभावाने बुलढाणा पोलीस नियंत्रण कक्षात सलग्न करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीची जबाबदारी खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तपासादरम्यान मृतदेहाची ओळख निश्चित करण्यासाठी कोणते पुरावे तपासण्यात आले, आरोपींना अटक करण्यापूर्वी कोणती पडताळणी करण्यात आली आणि निष्पाप व्यक्तींना तुरुंगात पाठविण्यापर्यंत परिस्थिती कशी निर्माण झाली, याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
‘मृत’ घोषित करण्यात आलेली तरुणी जिवंत आढळल्याने केवळ तपास यंत्रणेची विश्वासार्हताच प्रश्नांकित झाली नसून निष्पाप व्यक्तींना आरोपी ठरविण्याच्या प्रकाराबाबतही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. चौकशी अहवालानंतर या प्रकरणात आणखी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.