बुलढाणा:- लग्न समारंभ आटोपून मित्रांसोबत घरी परतत असताना झालेल्या भीषण दुचाकी अपघातात २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना धाड नाक्याजवळील नांद्राकोळी मार्गावरील सागवान शिवारात २७ मे रोजी रात्री घडली. विशेष म्हणजे अवघ्या २७ दिवसांपूर्वीच विवाहबद्ध झालेल्या या तरुणाच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सुंदरखेड (बुलढाणा) येथील तार कॉलनीत राहणारे पत्रकार दिगंबर कंकाळ यांचा मुलगा मंगेश कंकाळ (वय २५) हा मित्रांसोबत धाड परिसरात एका लग्न समारंभासाठी गेला होता. समारंभ आटोपल्यानंतर २७ मे रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास तो दोन मित्रांसह दुचाकी क्रमांक एमएच-२८-बीटी-२०८० ने बुलढाण्याकडे परतत होता. दरम्यान, धाड नाक्यापासून जवळच असलेल्या नांद्राकोळी मार्गावरील सागवान शिवारात दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात मंगेश कंकाळ याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेल्या एका मित्राला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अन्य एका मित्राला किरकोळ दुखापत झाली आहे. मंगेश कंकाळ यांचा विवाह १ मे २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला होता. नव्या संसाराची स्वप्ने रंगवत असतानाच लग्नानंतर अवघ्या २७ दिवसांत झालेल्या या दुर्दैवी अपघाताने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे नातेवाईक, मित्रपरिवार तसेच पत्रकार क्षेत्रात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील व आप्तस्वकीय असा परिवार आहे.