नांदुरा : उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असताना पिकांना पाण्याची तातडीची गरज असते. मात्र अशाच काळात चोरट्यांनी डाव साधत निमगाव, रामपूर व उदयपूर शेतशिवारातील तब्बल ४६ पोलवरील विद्युत तारा चोरी करून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चोरीमुळे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असून सुमारे शंभर शेतकऱ्यांचा वीजपुरवठा ठप्प झाल्याने ते मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, निमगाव परिसरातील नाफडे डी.पी.वरून विविध शेतांना विद्युत जोडणी देण्यात आली होती. या लाईनवरील तब्बल ४६ पोलवरील विद्युत तारा अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास कापून नेल्या. परिणामी या लाईनवर अवलंबून असलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी व मोटारी बंद पडल्या आहेत. सध्या उन्हाळ्याच्या तडाख्यात पिके व फळबागांना पाणी देणे अत्यावश्यक असताना अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांची मोठी पंचाईत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वीज वितरण कंपनीच्या ग्रामीण विभागाचे अभियंता राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरीबाबत लवकरच पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे पिकांना पाण्याची निकड असताना वीजतारे चोरीला गेल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. नुकसान टाळण्यासाठी महावितरणने तातडीने नवीन तारा टाकून वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी प्रभावित शेतकऱ्यांनी केली आहे.