जातीवाचक शिवीगाळ करत महिलेला मारहाण; आरोपीवर गुन्हा दाखल; लोणार येथील घटना

लोणार : तालुक्यातील उदनापूर येथे एका ६० वर्षीय महिलेवर जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध लोणार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप त्याला अटक झालेली नाही.
सविस्तर माहिती अशी की, १२ मार्च रोजी भीकाबाई लक्ष्मण नेमाडे (वय ६०) या आपल्या गावात सामाजिक कार्यात सक्रिय असताना जुन्या वादातून आरोपी रमेश अर्जुन मुळे याने त्यांच्याशी वाद घातला. वाद वाढत गेल्याने आरोपीने महिलेला लाथ मारून खाली पाडत मारहाण केली. तसेच अश्लील आणि जातीवाचक शब्दांत शिवीगाळ करून अपमान केल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.
घटनेनंतर पीडित महिलेने लोणार पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Comment