मेहकर: परतापूर शिवारातील एका शेतात दुपारच्या सुमारास अचानक आग्या मोहोळाच्या हल्ल्यामुळे गोंधळ उडाला. जेवणासाठी झाडाखाली बसलेल्या महिलांवर माशांनी हल्ला चढवला. या घटनेत पाच महिला, एक लहान मुलगी तसेच जनावरे जखमी झाली असून सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रामनगर परिसरातील विजय रामदास गिहे यांच्या शेतात दुपारी काम आटोपल्यानंतर काही महिला मजूर जांभळीच्या झाडाखाली जेवण्यासाठी बसल्या होत्या. या झाडावर मोहोळाचे पोळे असल्याची कल्पना नसल्याने त्या निर्धास्तपणे बसल्या होत्या. मात्र, अचानक मोहोळातील माशा बाहेर पडल्या आणि महिलांवर तुटून पडल्या.
या अनपेक्षित हल्ल्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बचावासाठी आरडाओरड सुरू झाल्यावर शेतातील इतर मजूर आणि गिहे यांनी धाव घेतली. त्यांनी तात्काळ कचरा जाळून धूर तयार केला आणि त्याच्या सहाय्याने महिलांना त्या ठिकाणाहून सुरक्षित बाहेर काढले. जवळपास अर्धा तास माशांचा त्रास सुरू होता.
या घटनेत अलका गिहे, लक्ष्मीबाई मोरे, वनिता देबाजे, मंगला कांबळे, लक्ष्मी इंगळे व रिया इंगळे (वय ७) या जखमी झाल्या आहेत. मदतीला गेलेल्या काही मजुरांनाही किरकोळ दंश झाले. तसेच शेतातील गाय व वासरूही जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर सर्व जखमींना मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते. अचानक झालेल्या या प्रकारामुळे शेतकरी व मजूर वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.