मलकापूर: शहरातील नागरी वस्त्यांमध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरमधून वाहनांमध्ये बेकायदेशीररीत्या गॅस भरणाऱ्या अड्ड्यांवर पोलिसांनी मंगळवारी (१७ मार्च) मोठी धडक कारवाई केली. या कारवाईत विविध ठिकाणांहून एक लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
खामगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मलकापूर शहरातील मुश्ताकअलीनगर, शिवाजीनगर आणि संत श्री रविदासनगर परिसरात घरगुती व रेशनवरील गॅस सिलिंडर साठवून त्यातून मोटार आणि प्रेशर पंपाच्या साहाय्याने वाहनांमध्ये गॅस भरण्याचा धंदा सुरू असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने संबंधित ठिकाणी छापे टाकले.
या कारवाईदरम्यान जाकीरखान सिकंदरखान, नितीन परसे, लक्ष्मण हंबडे, शेरसिंह राजपूत आणि शाकीरखान सिकंदरखान या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २८४, २८५ तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. छाप्यात पोलिसांनी गॅस भरण्यासाठी वापरले जाणारे विविध साहित्य जप्त केले. यामध्ये वजनकाटे, विविध क्षमतेच्या विद्युत मोटारी, रबरी नळ्या, पितळी नोझल्स, इलेक्ट्रिक उपकरणे तसेच व्यावसायिक वापराचे गॅस सिलिंडर यांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १ लाख ३ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश रोकडे करीत असून, शहरातील अशा बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.