दुसरबीड :- सोन्याची पोत लुटण्याच्या घटनेचा अवघ्या दोन तासांत छडा लावत किनगाव राजा पोलिसांनी गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत मुख्य आरोपीसह चार जणांना अटक करण्यात आली असून, अनेक गुन्ह्यांची उकल झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १७ मार्च रोजी गजानन ताठे (रा. दुसरबीड) यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या आईच्या गळ्यातील सुमारे १३ ग्रॅम मणी व २ ग्रॅम पानाडी असलेली अंदाजे दीड लाख रुपये किमतीची सोन्याची पोत अज्ञात आरोपींनी चाकूचा धाक दाखवून लुटली होती.
घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत सापळा रचला. तपासादरम्यान मुख्य आरोपी दत्ता बिथरे याला गंधारी परिसरातून अटक करण्यात आली. त्यानंतर इतर साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे परिसरातील अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अटक आरोपींकडून इतर गुन्ह्यांबाबतही चौकशी सुरू असून न्यायालयाने मुख्य आरोपीला पोलिस कोठडी सुनावली आहे.