मलकापूर :- तालुक्यातील हिंगणाकाझी येथील २२ वर्षीय युवक कामासाठी जातो असे सांगून घरातून निघून गेल्यानंतर परत न आल्याने कुटुंबीयांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे.
मलकापूर तालुक्यातील हिंगणाकाझी येथील रहिवासी रेहानाबी शेख समीर पिंजारी (वय ३९) यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, त्यांचा मुलगा रमजान शेख समीर पिंजारी (वय २२) हा मलकापूर येथे कामाला जातो असे सांगून घरातून निघून गेला. मात्र त्यानंतर तो घरी परतला नाही.
कुटुंबीयांनी त्याचा परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला; मात्र तो कुठेही आढळून आला नाही. त्यामुळे अखेर मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बेपत्ता युवकाची उंची सुमारे ५ फूट असून रंग काळासावळा आहे. अंगात पांढऱ्या रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट, काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट आणि पायात भुऱ्या रंगाची स्लिपर चप्पल असल्याचे वर्णन देण्यात आले आहे. केस काळ्या रंगाचे व साधारण आहेत. सदर वर्णनाचा युवक कुठेही आढळून आल्यास मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.