मलकापूर :- मलकापूर येथील एसटी बसस्थानकावर ‘नाथजल’ पिण्याच्या पाण्याची बाटली निर्धारित १५ रुपयांच्या ऐवजी २० रुपयांना विक्री केली जात असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपप्रमुख रामधन खोडके यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.
रामधन खोडके यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मलकापूर बसस्थानकातील अमानुल्ला जबाउल्ला खान यांच्या जनरल स्टोअर्समध्ये ‘नाथजल’ पाण्याची बाटली खरेदी करताना त्यांच्याकडून २० रुपये घेतले गेले. प्रत्यक्षात या बाटलीची किंमत १५ रुपये असताना अधिक दर आकारला जात असल्याबाबत जाब विचारल्यावर संबंधित विक्रेत्याने अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यावेळी विक्रेत्याने “पाणी थंड करून देण्याचे ५ रुपये अतिरिक्त घेतो” असे सांगितल्याचेही खोडके यांनी निवेदनात नमूद केले आहे. तसेच बसस्थानकात ‘नाथजल’ पाण्याच्या बाटलीसाठी अधिकृत एजन्सी किंवा हॉकर्स परवाना आहे का, अशी विचारणा केल्यावर संबंधितांनी “एजन्सी आमच्याकडेच आहे आणि आम्ही कोणत्याही दराने विक्री करू शकतो” असे सांगितल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, एसटी महामंडळाच्या नियमांनुसार ‘नाथजल’ पाण्याची विक्री अधिकृत हॉकर्स परवान्यावरच करणे आवश्यक असताना बसस्थानकात अशा प्रकारचा अधिकृत स्टॉल दिसत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून निर्धारित दराबाबत कोणतेही सूचना फलकही लावलेले नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
या प्रकरणात अवैध विक्री तात्काळ थांबवून संबंधितांचा परवाना रद्द करावा, तसेच दुकानात गुंड प्रवृत्तीचे आणि अल्पवयीन अपंग बालकामगार काम करत असल्याच्या बाबीचीही सखोल चौकशी करावी, अशी मागणी खोडके यांनी केली आहे. अन्यथा याबाबत मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.