तलावात पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू; ईदच्या दिवशी शोककळा

 

खामगाव :- शहरातील जनुना तलावात पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी घडली. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. ईदच्या दिवशीच ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मो. अर्सलान मो. नईम (वय १७, रा. बर्डे प्लॉट) असे मृत मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास मित्रासोबत जनुना तलाव परिसरात पोहण्यासाठी गेला होता. तलावातील छत्रीजवळ पोहोचल्यानंतर त्याने पाण्यात उडी घेतली; मात्र पाण्याची खोली लक्षात न आल्याने तो अचानक बुडू लागला. काही क्षणांतच तो पाण्याखाली गेल्याचे लक्षात येताच त्याच्या मित्राने मदतीसाठी आरडाओरडा केला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने तसेच प्रशासनाच्या सहकार्याने तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. बचाव पथकाने बोटीद्वारे तलावात शोध घेत सायंकाळी सुमारे ६.३० वाजता अर्सलानचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठविला. या घटनेमुळे बर्डे प्लॉट परिसरात शोककळा पसरली असून, निष्काळजीपणे पाण्यात उतरण्याच्या घटनांबाबत नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.

Leave a Comment