मलकापुरात बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न!

मलकापूर :- शहरातील हनुमान चौक परिसरातील भारत कला रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमवर मध्यरात्री अज्ञात चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सुमारे 1 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने एटीएम बूथमध्ये प्रवेश करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली. त्यानंतर एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, मशीन फोडताना झालेल्या मोठ्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांना जाग आली. त्यामुळे चोरी उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाल्याने चोरट्याने घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेत एटीएममधील रोकड सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. दरम्यान, शहरातील प्रमुख भागात अशा प्रकारची घटना घडल्याने सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Leave a Comment