आठवडी बाजारात मधमाशांचा हल्ला; १५ ते २० जण जखमी

साखरखेर्डा :- येथील गजबजलेल्या आठवडी बाजारात अचानक मधमाशांनी हल्ला चढविल्याने व्यापारी व ग्राहकांची मोठी धावपळ उडाल्याची घटना शुक्रवारी (दि. २०) सकाळी घडली. या प्रकारात सुमारे १५ ते २० नागरिक जखमी झाले असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी असताना अचानक मधमाशांचा थवा येऊन नागरिकांवर तुटून पडला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी पळापळ सुरू केली, तर काही जणांनी जवळील दुकाने व सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. या घटनेत काही व्यापारी व ग्राहकांना मधमाशांच्या दंशामुळे दुखापत झाली. जखमींना तत्काळ स्थानिक पातळीवर उपचार देण्यात आले. घटनेनंतर काही काळ बाजारपेठेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, अशा घटनांपासून बचावासाठी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

Leave a Comment