खामगाव :- तालुक्यातील मच्छिंद्रखेड येथील श्री जाणाई माता यात्रेदरम्यान गर्दीचा फायदा घेत चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना जागरूक नागरिकांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना समोर आली आहे. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर यात्रेत मोठी गर्दी असताना हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदा काशीराम अवचार (वय 47, रा. हिंगणा इसापूर, ता. नांदुरा) या 19 मार्च रोजी सकाळी सुमारे साडेपाच वाजताच्या सुमारास जाणाई माता मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी एका 19 वर्षीय विवाहिता व तिच्या साथीदाराने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयास्पद हालचाली लक्षात येताच उपस्थित भाविकांनी तत्काळ सतर्कता दाखवत दोघींना पकडले. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकारामुळे यात्रेत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, गर्दीच्या ठिकाणी चोरीच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.