मोताळा :- तालुक्यातील काबरखेड शिवारात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला मारहाण करून दुचाकीचे नुकसान केल्याची घटना 19 मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वैभव भास्कर हिवाळे (रा. काबरखेड) हे आपल्या शेतात असताना गावातील योगेश भानुदास सोनुने हा मोठ्याने ओरडत होता. त्याला शांत राहण्यास सांगितल्याने संतप्त झालेल्या सोनुने यांनी वाद घालत शिवीगाळ केली आणि हिवाळे यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यावेळी आरोपीने संतापाच्या भरात जवळ उभी असलेल्या दुचाकीवर दगड मारून सुमारे पाच हजार रुपयांचे नुकसान केले. या घटनेनंतर पीडिताने पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.