मेहकर :- तालुक्यातील उकळी सुकळी येथे गुरुवारी सकाळी सुमारे 9 वाजताच्या सुमारास झालेल्या विजेच्या कडकडाटात जगदंबा संस्थानच्या प्रवेशद्वारावर वीज कोसळून नुकसान झाल्याची घटना घडली. या घटनेत प्रवेशद्वाराच्या वरच्या भागाचा काही अंश तुटून पडला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेच्या वेळी परिसरात ढगाळ वातावरणासह विजांचा जोरदार कडकडाट सुरू होता. अचानक झालेल्या विजेच्या प्रहारामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान, अवकाळी हवामानाचा परिणाम शेतीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या गहू व कांदा पिके काढणीच्या टप्प्यावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तालुक्यातील काही भागांत अवकाळी पावसाची नोंद झाली असून पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.