चिंचपूर शिवारात युवकाची रोकड लुटली; बोराखेडी पोलिसांनी २ तासांत आरोपींना बेड्या

मोताळा: – नांदुरा तालुक्यातील युवकाच्या खिशातील ७ हजार रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या दोन आरोपींना बोराखेडी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत पकडून गुन्ह्याचा छडा लावला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे ही जलद कारवाई करण्यात आली.
नांदुरा तालुक्यातील खडदगाव येथील मंगेश सुनील घोगले (वय २८) हा २० मार्च रोजी मोटारसायकल क्रमांक MH-19-ER-2292 वरून प्रवास करत होता. सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास बुलढाणा–मलकापूर रोडवरील बाबा पेट्रोल पंप परिसरात शंकर श्रीराम चव्हाण (रा. मोताळा) व अमजद शाह कदर शाह (रा. बिस्मिल्ला नगर, जामनेर ता. जामनेर जि. जळगाव) यांनी संगनमताने त्याच्या खिशातील ७ हजार रुपयांची रोकड चिंचपूर शिवारात लंपास केली.
या घटनेप्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक सिताराम मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कपले, पोहेकॉ. नंदकिशोर धांडे, हेकॉ. कपिश काशपाग व पोकॉ. ज्ञानेश्वर धामोडे यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या दोन तासांत आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले.
पोलीसांनी आरोपींकडून लंपास केलेली ७ हजार रुपयांची रोकड जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment