मलकापूर :- रक्त हे रस्त्यावर वाहण्यापेक्षा मानवाच्या धमन्यांमध्ये वाहिले पाहिजे, हा मानवतावादी संदेश संपूर्ण विश्वाला देणारे युगपुरुष बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या शिकवणीनुसार आणि वर्तमान सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या असीम कृपेने, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन व मलकापूर शाखेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रविवार, दि.२२ मार्च २०२६, डॉ. हेडगेवार भवन, चांडक विद्यालय येथे पार पडलेल्या या शिबिरात ५० रक्तदात्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्साहाने सहभागी होत आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले.
या रक्तदान शिबिराचे शुभहस्ते उद्घाटन प.पू. संतोषजी शेगोकार (संयोजक तथा ज्ञान प्रचारक, संत निरंकारी मंडळ) यांच्या हस्ते संपन्न झाले. उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, संत निरंकारी मंडळ हे केवळ अध्यात्माचा प्रचार करत नाही, तर ‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा’ या उक्तीनुसार सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असते. रक्तदानासारख्या पवित्र कार्यातून आपण कोणाचे तरी प्राण वाचवू शकतो, हाच खरा परमार्थ असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
रक्त संकलनासाठी बुलडाणा आणि अकोला येथून विशेष वैद्यकीय चमू पाचारण करण्यात आली होती. या तज्ज्ञ डॉक्टरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत सुरक्षितरीत्या व वैद्यकीय नियमांचे पालन करून रक्त संकलनाची प्रक्रिया पूर्ण केली. सकाळपासूनच मलकापूर शहर आणि परिसरातील तरुण तसेच भाविक बांधवांनी रक्तदानासाठी आपला सहभाग नोंदवला होता. हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मलकापूर शाखेतील सेवादल युनिटचे सर्व सेवादल आणि साधसंगत यांनी अतिशय सुयोग्य नियोजन आणि व्यवस्थापन केले होते.
या प्रसंगी मलकापूर शाखेचे मुखी आदरणीय दयाळू चव्हाणजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना निरंकारी मिशनच्या सेवाभावी कार्याची माहिती दिली आणि रक्तदात्यांचे, उपस्थितांचे आणि डॉक्टर चमुचे आभार मानले.