शेतातील गोठा फोडून म्हशी व शेळ्यांची चोरी; १.४३ लाखांचा ऐवज लंपास

साखरखेर्डा : तालुक्यातील राजेगाव परिसरात अज्ञात चोरट्यांनी शेतातील गोठ्याचे कुलूप तोडून पाळीव जनावरांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत दोन म्हशी, एक वगार शेळी व दोन पिल्ले असा सुमारे १ लाख ४३ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेंदुर्जन – सुलतानपूर मार्गावरील राजेगाव शिवारात अरविंद मधूकर तांगडे यांची शेती आहे. शेतात त्यांनी जनावरांसाठी गोठा बांधला असून त्यामध्ये दोन म्हशी, वगार शेळी व दोन पिल्ले बांधून ठेवलेली होती.
दरम्यान २२ मार्चच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गोठ्याचे कुलूप व कोंडा तोडून जनावरे एका वाहनात भरून नेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सकाळी शेतात गेल्यानंतर गोठ्याचे कुलूप तुटलेले व जनावरे गायब असल्याचे लक्षात येताच चोरीचा प्रकार उघड झाला.
या प्रकरणी अरविंद मधूकर तांगडे यांनी २३ मार्च रोजी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चोरीस गेलेल्या जनावरांची एकूण किंमत अंदाजे १ लाख ४३ हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेचा पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार रामदास वैराळ करीत असून परिसरातील शेतकऱ्यांनी जनावरांच्या सुरक्षेबाबत अधिक दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Comment