मेहकर :- तालुक्यातील हिवरा साबळे शिवारात शेतात ठेवलेले हळदीचे बेणे अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली असून, या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिवरा साबळे येथील शेतकरी गजानन नारायण साबळे यांनी गट क्रमांक 15 मधील अर्धा एकर क्षेत्रात सेलम जातीची हळद लागवड केली होती. 22 मार्च रोजी त्यांनी हळद काढून त्याचे बेणे तयार केले होते. हे बेणे देण्यासाठी त्यांनी एकूण 13 पोती शेतात ठेवली होती.
मात्र, 23 मार्च रोजी सकाळी संबंधित शेतकरी बेणे घेण्यासाठी शेतात गेल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला. ठेवलेल्या 13 पोत्यांपैकी 10 पोती बेणे चोरीला गेल्याचे आढळले, तर केवळ तीन पोती शेतात शिल्लक होती. घटनास्थळी रत्नापूर रस्त्याकडे जाणाऱ्या पाऊलखुणा आढळून आल्याने चोरट्यांनी नियोजनपूर्वक ही चोरी केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच या बेण्याची मागणी असल्याने त्यावरच लक्ष ठेवून चोरी करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याप्रकरणी गजानन साबळे यांच्या तक्रारीवरून डोणगाव पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, शेतीमाल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.