वांग्याच्या पिकात लपवून अफूची शेती; मध्यरात्री कारवाईत मोठा साठा जप्त!

देऊळगाव राजा :- तालुक्यातील मेरा खुर्द येथे वांग्याच्या पिकामध्ये अफूची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, स्थानिक गुन्हे शाखा व अंढेरा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठ्या प्रमाणात अफू जप्त केली आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २४ मार्चच्या मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक देऊळगाव राजा परिसरात गस्त घालत असताना गोपनीय माहितीच्या आधारे संशयित शेतावर छापा टाकण्यात आला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंढेरा पोलिसांच्या मदतीने गट क्रमांक २०३ मधील शेताची तपासणी करण्यात आली. प्रारंभी शेतात वांग्याचे पीक दिसत असले तरी सखोल पाहणी केल्यानंतर त्यामध्ये अफूची झाडे कुशलतेने लपवून ठेवलेली असल्याचे उघड झाले. पंचांसमक्ष ही झाडे उपटून जप्त करण्यात आली. या कारवाईत मुळांसह पाने व बोंडे असलेला सुमारे ११.४७९ किलो अफूचा साठा हस्तगत करण्यात आला, ज्याची किंमत अंदाजे ९ लाख १८ हजार रुपयांहून अधिक असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अविनाश जायभाये यांच्या फिर्यादीवरून कृष्णा रामहरी वाघमारे (वय २६, रा. मेरा खुर्द) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई रात्री उशिरापासून पहाटेपर्यंत चालली असून, उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली. दरम्यान, या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अवैध शेतीविरुद्ध पोलिसांनी कारवाई तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

Leave a Comment