मलकापूर : शहरातील बसस्थानक परिसरात हातात गुप्ती घेऊन आरडाओरड करत दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाला मलकापूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल योगेश प्रभाकर तायडे यांना गुप्त माहिती मिळाली की, बसस्थानक परिसरातील हनुमान मंदिराजवळ एक तरुण हातात गुप्ती घेऊन मोठमोठ्याने आरडाओरड करत परिसरात दहशत निर्माण करत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. २४ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याची ओळख अतुल भानुदास सोभागे (वय १९, रा. अंधाई पो. शेलसूर, ता. चिखली) अशी पटली. पोलिसांनी त्याच्याकडे गुप्ती हे शस्त्र बाळगण्याबाबत परवाना आहे का, अशी विचारणा केली असता त्याने कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून मुठीसह एकूण सुमारे ३४ सेंटीमीटर लांबीची स्टीलची गुप्ती जप्त केली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल योगेश तायडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.