देऊळगाव राजा : टाकरखेड भागिले येथील स्वप्नपूर्ती वाईन बारमध्ये अज्ञात चोरट्याने दुकानाचा कोंडा तोडून आत प्रवेश करत नगदीसह सीसीटीव्ही यंत्रणा चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टाकरखेड भागिले येथील स्वप्नपूर्ती वाईन बार हा फिर्यादी दिलीप देवराव कांबळे (वय ५३, व्यवसाय – मॅनेजर, रा. त्रंबक नगर, देऊळगाव राजा) यांच्या ताब्यात आहे. २३ मार्च रोजी रात्री ९.३० वाजल्यापासून ते २४ मार्च रोजी सकाळी ८.२० वाजेपर्यंतच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने दुकानाचा कोंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने दुकानातील सुमारे ३ हजार रुपये रोख रक्कम तसेच डीव्हीआर, वायफाय यंत्रणा आणि सीसीटीव्ही कॅमेरे असा एकूण अंदाजे १३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सकाळी दुकान उघडताना चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
याप्रकरणी फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार शरद साळवे हे पोलीस उपनिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.