महसूल कार्यालयात कर्मचाऱ्यावर हल्ला, शासकीय कामात अडथळा; गुन्हा दाखल!

देऊळगाव राजा :- तालुक्यातील तुळजापूर वर्क स्टेशन येथील महसूल कार्यालयात एका व्यक्तीने कर्मचाऱ्यावर हल्ला करत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधिताविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महसूल सेवक रामप्रसाद शिवाजी शेरे (वय ३५, रा. बोराखेडी बावरा) हे २४ मार्च रोजी सकाळच्या सुमारास महसूल अधिकारी बबन काकड व सहकारी गजानन शेळके यांच्यासह अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार करण्याच्या कामात व्यस्त होते. दरम्यान, विष्णू सर्जेराव म्हस्के (रा. बोराखेडी बावरा) हा अचानक कार्यालयात दाखल झाला. त्याने अधिकाऱ्यांशी वाद घालत आक्रमक भूमिका घेतली. यावेळी हस्तक्षेप करणाऱ्या रामप्रसाद शेरे यांच्यावर त्याने शिवीगाळ करत मारहाण केली. या हल्ल्यात शेरे यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली असून, आरोपीने त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय, आरोपीने कार्यालयातील काही महत्त्वाची कागदपत्रे आणि सर्व्हे अहवाल फाडून टाकत कामकाजात अडथळा निर्माण केला. घटनेनंतर देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment