मलकापूर : तालुक्यातील विवरा – भानगुरा शिवारातील सौरऊर्जा प्रकल्पात अज्ञात चोरट्यांनी धाड टाकत लाखो रुपयांचे साहित्य लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दसरखेड एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भानगुरा शिवारात असलेल्या कल्पा पॉवर प्रा. लि. या सौरऊर्जा प्रकल्पातील सुप्रिम ब्लॉक व नेटमेंक ब्लॉक परिसरात चोरीची घटना घडली. १२ मार्च ते १३ मार्च २०२६ रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रकल्पातील दोन्ही ब्लॉकमधील ८ इन्व्हर्टरमधून अंदाजे ११ हजार ७०० मीटर डीसी स्ट्रींग कॉपर केबल कापून नेली. या केबलची अंदाजे किंमत २ लाख ८८ हजार ५०० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
या संदर्भात कल्पा पॉवर प्रा. लि. चे असिस्टंट मॅनेजर निलेश बापुसो निकम यांनी दसरखेड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध अप क्रमांक ३५/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, सौरऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेचा पुढील तपास दसरखेड एमआयडीसी पोलीस करीत आहेत.