मलकापूर : तालुक्यातील पान्हेरा परिसरात झालेल्या वादातून एका व्यक्तीला लोखंडी रॉड व चापट-बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अरुण श्यामराव तायडे (वय ४२, रा. पान्हेरा वडोदा, ता. मलकापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. २५ मे रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या दरम्यान पान्हेरा गावाजवळील पुलाजवळ ही घटना घडली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपी भैय्या ज्ञानदेव गायकवाड याने “तू जास्त मस्ती करतोस” असे म्हणत लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर मुन्ना ज्ञानदेव गायकवाड, निलेश विजय वेरूळकर आणि अमोल विजय वेरूळकर यांनीही चापट-बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच संबंधितांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या तक्रारीच्या आधारे मलकापूर शहर पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध अप. क्र. ४१०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉं रामचंद्र भोपळे करीत आहेत.