हॉटेल च्या तळघरात सुरू होता कुटंखाना, पोलिसांनी डमी ग्राहक पाठविला, मग कार्यक्रम केला, हॉटेल ‘एकांत’ मधील देहव्यापार अड्ड्यावर छापा; तीन जण ताब्यात

मेहकर : शहरातील बायपास रोडवरील ‘एकांत हॉटेल अँड लॉजिंग’मध्ये सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर मेहकर पोलिसांनी धाडसी छापा टाकत कुंटणखाना चालविणाऱ्या इसमासह दोन महिलांना ताब्यात घेतले. या प्रकरणी हॉटेल मालकासह संबंधितांविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, मेहकर बायपासवरील अर्धवट बांधकाम असलेल्या ‘एकांत हॉटेल अँड लॉजिंग’च्या तळघरात काही महिलांकडून देहव्यापार चालविला जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर एस. आलेवार यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी प्रथम एक ‘डमी ग्राहक’ पाठवून खात्री केली. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पंचांसमक्ष हॉटेलवर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान प्रमोद धनसिंग पवार (रा. बिबी, ता. लोणार) हा इसम कुंटणखाना चालविताना रंगेहाथ आढळून आला. तसेच घटनास्थळी दोन महिलांची सुटका करण्यात आली.
या प्रकरणी आरोपी प्रमोद पवार तसेच लॉज मालकाविरुद्ध मेहकर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक १८३/२०२६ अन्वये अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ च्या कलम ३, ४, ५, ६ व ७ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
दरम्यान, शहरात किंवा परिसरात अशा प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment