अज्ञाताकडून हरभऱ्याच्या गंजीला आग; शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान

मोताळा : तालुक्यातील खैरा शिवारात अज्ञात इसमाने शेतकऱ्याच्या हरभऱ्याच्या गंजीला आग लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या आगीत २६ क्विंटल हरभरा जळून खाक झाला आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्याचे सुमारे १.३० ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खैरा येथील शेतकरी राहुल शांतीदास मापारी यांच्या गट नं. १५३ मधील शेतात काढणीसाठी ठेवलेली हरभऱ्याची २६ क्विंटल गंजी १६ मार्च रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास अज्ञात इसमाने पेटवून दिली. ही घटना लक्षात येताच शेतकऱ्याने तत्काळ संबंधित पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
फिर्यादीवरून बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये अप क्रमांक १३५/२०२६ नुसार कलम ३२६ (फ) बीएनएस २०२३ अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुपडसिंग चव्हाण करीत आहेत. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती व संतापाचे वातावरण पसरले असून, आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Leave a Comment