नांदुरा : इंदोर येथील एका व्यापाऱ्याची तब्बल ९ लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कांदा खरेदी करून दुसऱ्या व्यापाऱ्याला विक्री करत पेमेंट स्वतःकडे ठेवत मूळ व्यापाऱ्याला पैसे न देता गंडा घालण्यात आला. या प्रकरणी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शेख वसीम आणि त्याचा भागीदार शेख साजिद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी एकाला अटक केली आहे तर मुख्य आरोपी फरार आहे.
प्राप्त माहितीनुसार, नांदुरा येथील एस. के. ट्रेडिंग कंपनीचे शेख साजिद आणि शेख वसीम हे दोघे भागीदारीत भाजीपाला व्यापार करतात. त्यांनी इंदोर येथील अथर्व ट्रेडर्सचे मालक वैभव खंडारे यांच्याकडून १ डिसेंबर २०२३ रोजी २५ टन कांदा (किंमत ९ लाख ५३ हजार ७०० रुपये) खरेदी केला होता. परिचय असल्याने खंडारे यांनी विश्वासाने माल दिला. दरम्यान, हा कांदा आरोपींनी छत्तीसगडमधील रायपूर येथील अनिकेत ट्रेडिंग कंपनीला विकला. संबंधित कंपनीने ६ डिसेंबर रोजीच पेमेंट शेख साजिद यांच्या खात्यात जमा केले होते. मात्र, खरेदी केलेल्या मालाचे पैसे देण्यास टाळाटाळ करत आरोपींनी खंडारे यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. एवढेच नव्हे, तर पैसे मागितल्यास आत्महत्येची धमकी देत दडपण आणण्याचा प्रयत्नही करण्यात आला.
या प्रकरणी वैभव खंडारे यांनी १८ डिसेंबर २०२३ रोजी इंदोर येथील राजेंद्र नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस तपासात आरोपींनी संगनमत करून फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, गुन्हा नोंदवण्यासाठी विलंब होत असल्याने फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली. प्रथम श्रेणी न्यायालयाने ४ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १२० (ब), ४०६, ४०९ व ४२० अंतर्गत गुन्हा नोंदवला.
यानंतर इंदोर पोलिसांनी ७ मार्च रोजी नांदुरा येथून शेख साजिद याला अटक केली. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि मलकापूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष शेख वसीम हा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.