खामगाव : तालुक्यातील गणेशपूर येथे पत्ते खेळण्याच्या कारणावरून दोन व्यक्तींमध्ये झालेला वाद मारहाणीपर्यंत पोहोचल्याची घटना १५ मार्च रोजी घडली. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दिल्याने हिवरखेड पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेशपूर येथील कैलास देविदास टेटवार (वय ३८) व बिस्मीला खान सुलेमान खान (वय ४०) हे एकाच गावातील रहिवासी आहेत. टेटवार यांच्या तक्रारीनुसार, बिस्मीला खान हे त्यांच्या घरी येऊन पत्ते खेळण्यासाठी सोबत येण्याचा आग्रह करू लागले. मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर वाद निर्माण झाला. या वादातून शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, बिस्मीला खान यांनीही पोलिसांत तक्रार दाखल करत टेटवार यांनीच आपल्यावर हल्ला केल्याचा दावा केला आहे. या घटनेमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.