मलकापूर : घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पुरवठा विभागाने शहरात मोठी कारवाई करत २० ते २२ हॉटेलांवर धाडी टाकल्या. या धाडीत सात हॉटेल धारकांकडून घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर आढळून आल्याने ते जप्त करण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे.
सद्यस्थितीत इंधन तुटवड्याची शक्यता लक्षात घेता घरगुती गॅसचे वितरण सुरळीत राहावे, यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार मलकापूर तालुक्यात तहसीलदार समाधान सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यीय दक्षता पथकाची स्थापना करण्यात आली आहे. दि. १७ मार्च रोजी या पथकाने शहरातील विविध भागांमध्ये अचानक धाडी टाकून हॉटेल व्यावसायिकांची तपासणी केली. या तपासणीदरम्यान सात ठिकाणी घरगुती एलपीजी सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संबंधितांकडून एकूण सात सिलेंडर जप्त करण्यात आले.
या कारवाईत पुरवठा अधिकारी धनश्रीताई हरणे, नायब तहसीलदार नामदेव राठोड, मंडळ अधिकारी के. जी. राजपूत, तलाठी धीरज जाधव, तलाठी एम. सी. एदलाबादकर, महसूल सहाय्यक निशांत चव्हाण तसेच महसूल कर्मचारी निलेश म्हात्रे, निलेश तायडे व सतीश राठोड यांनी सहभाग घेतला. दरम्यान, घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर केल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला असून पुढील काळातही अशा धाडी सुरू राहणार असल्याचे पुरवठा अधिकारी धनश्रीताई हरणे यांनी स्पष्ट केले आहे.