पाणीपुरवठा विभागातील झाडे तोड प्रकरणी उशिरा गुन्हा दाखल; अज्ञात आरोपीवर कारवाई

मलकापूर : शहरातील पाणीपुरवठा विभागाच्या फिल्टर प्लांट परिसरातील झाडे तोडल्याच्या प्रकरणात अखेर १० दिवसांनी नगर परिषद प्रशासनाने तक्रार दाखल करत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या उशिरामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चर्चा रंगत आहे.
सविस्तर वृत्त असे की, नगर परिषद पाणीपुरवठा विभागाच्या फिल्टर प्लांट परिसरात ८ मार्च रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने ५ सुबाभुळीची झाडे तोडून नेल्याची घटना घडली होती. या घटनेत सुमारे ५ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची नोंद आहे.
याप्रकरणी उपमुख्याधिकारी विठ्ठल बाळासाहेब भुसारी यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून अप. क्र. १८८/२०२६ अन्वये कलम ३२४ (२) बीएनएस अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, झाडांची तोड ८ मार्च रोजी झाल्यानंतर तब्बल १० दिवसांनी तक्रार दाखल केल्यामुळे नगर परिषद प्रशासनाच्या भूमिकेवर टीका होत असून, संबंधित आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Leave a Comment