मुंदडा पंपाजवळ कंटेनरची पिकअपला धडक; चौघे जखमी

मलकापूर :- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील मुंदडा पेट्रोल पंपाजवळ भरधाव कंटेनरने बोलेरो पिकअपला दिलेल्या जोरदार धडकेत चालकासह तीन मजूर जखमी झाल्याची घटना 14 मार्च रोजी पहाटे घडली. या अपघातात पिकअप वाहन रस्त्याच्या खाली पलटी झाल्याने मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील पंकज मंगल धनगर (वय 35) हे आपल्या बोलेरो पिकअप (एमएच-19-सीएक्स-3429) वाहनाने मजुरांसह हैदराबादहून परत येत होते. पहाटे सुमारे २ वाजताच्या सुमारास त्यांचे वाहन मुंदडा पेट्रोल पंपाजवळ आले असता, मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनर (डीडी-01-एन-9713) ने पिकअपला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेमुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून पिकअप रस्त्याच्या खाली जाऊन उलटली. अपघातात पंकज धनगर यांच्यासह वाहनातील अन्य तीन मजूर जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी हलविण्यात आले.
या घटनेनंतर परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. दरम्यान, 17 मार्च रोजी पंकज धनगर यांच्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलीस ठाण्यात कंटेनर चालक अजय कुमार गुलाबचंद दहिया (वय 30, रा. मडवा, जि. रोवा, मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Comment